भुसावळ येथे गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज जयंती उत्साहात
समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती; प्रतिमापूजनासह विविध उपक्रमांनी रंगला जयंती सोहळा
भुसावळ | प्रतिनिधी :
यावल रोडवरील सूर्यमुखी हनुमान मंदिर व सेंट लायसेस शाळा परिसरात गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज राजा यांची जयंती उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास गुर्जर समाजबांधवांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील, कंडारीचे माजी सरपंच डॉ. सूर्यभान पाटील, दोडे गुर्जर समाजाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह सहसंचालक मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नवलसिंग राजे पाटील आणि डॉ. सूर्यभान पाटील यांच्या हस्ते गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी चव्हाण सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजा मिहीर भोज यांच्या जीवनकार्यावर, शौर्यावर आणि ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घेऊन एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचे जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंती सोहळ्यानिमित्त नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते उपस्थित समाजबांधवांना गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्स्फूर्तपणे पार पडले.
समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक एकोपा आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा जयंती सोहळा सलोख्याच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.




