खिचडीच्या विषबाधेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू!
चिंचोली लिंबाजीतील थोटे कुटुंबावर काळाचा घाला; अवघ्या दोन दिवसांत आई-वडिलांनी गमावली दोन लेकरं
पारोळा/सुरेश पाटोळे | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील थोटे कुटुंबावर नियतीने अत्यंत दुर्दैवी आघात केला आहे. रात्री कुटुंबीयांनी एकत्र खाल्लेल्या खिचडीनंतर घरातील चौघांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान अवघ्या दोन वर्षांच्या आयुष थोटे आणि त्याची सहा वर्षांची बहीण गायत्री थोटे या दोन्ही चिमुकल्यांचा सलग दोन दिवसांत मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (३५) यांच्या कुटुंबात पत्नी देवशाला (३०), मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष असे चौघे सदस्य होते. नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी घरात चुलीवर स्वयंपाक करण्यात आला. कुटुंबीयांनी एकत्र बसून खिचडीचे जेवण केले. मात्र, त्यानंतर काही तासांतच परिस्थितीने गंभीर वळण घेतले.

बुधवारी पहाटेपासून नारायण थोटे, त्यांच्या पत्नी देवशाला तसेच दोन्ही मुलांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने उपचारासाठी पुढील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, दोन्ही चिमुकल्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. उपचार सुरू असतानाच दोन वर्षांचा आयुष याचा मृत्यू झाला. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच दुसऱ्याच दिवशी सहा वर्षांची गायत्री हिचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने पोटच्या दोन्ही मुलांना गमावण्याची वेळ आई-वडिलांवर आली.
लहान मुलांच्या हसण्या-खेळण्याने गजबजलेल्या घरात क्षणातच मातम पसरला. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, खिचडी खाल्ल्यानंतरच कुटुंबातील सर्व सदस्यांना त्रास सुरू झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण काय होते, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात अन्नपदार्थ बनविताना स्वच्छता, साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.




