धुळ्यातील अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी आक्रमक; कारवाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू
धुळे : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी आक्रमक झाली असून, या धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जेलरोड परिसरात धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. या अवैध धंद्यांमुळे गुंडगिरीला खतपाणी मिळत असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

अवैध धंद्यांविरोधात आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह पत्रकारांवरही काही वेळा खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने या अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून काढत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील अवैध धंदे सरसकट बंद करावेत, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद केले नाहीत, तर आंदोलनाच्या ठिकाणीच अवैध धंद्यांचे स्टॉल लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे राहुल वाघ यांनी दिला आहे.
या आंदोलनावेळी भीम आर्मीचे राहुल वाघ, सागर चव्हाण, मुस्तकीम खान, अजय मंगळे, मयूर तपासे, अशोक निकम, रोशन केदार, निलेश शिंपी, दर्शील खैरणार, देवेंद्र चौधरी, तेजस पाटील, महेश पाटील, प्रशांत चव्हाण, उमेश पाटील, धनंजय पाटील, वैभव पाटील, योगेश चव्हाण, भूषण वेदे, इरशाद खान, शाहरुख खान, अरकम खान आणि सचिन खरात यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




