जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला उत्साहात सुरुवात
साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा संगम घडविण्याचा संकल्प; पहिल्याच बैठकीला साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मलकापूर प्रतिनिधी : आगामी २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीची पहिली बैठक हॉटेल औदुंबर, टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे संमेलन अधिक व्यापक, दर्जेदार आणि संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनाची रूपरेषा, विविध साहित्यिक उपक्रम, नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच साहित्यप्रेमींच्या व्यापक सहभागाबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला समकालीन विचारांची जोड देत नव्या पिढीला साहित्याशी जोडणे, नवोदितांना प्रोत्साहन देणे आणि साहित्यिकांना अभिव्यक्तीचे व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने संमेलनाचे नियोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस डॉ. संघर्ष सावळे, डॉ. बबन महामुने, डॉ. डी. व्ही. खरात, डॉ. मधुकर दिवेकर, प्रा. डी. के. मांडलिक, डॉ. बेनझीर शेख, रझिया शेख, अभिनिता सावळे आणि आदर्श सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिल्याच बैठकीला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्वांच्या सकारात्मक सहभागामुळे आगामी जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या यशाची शुभमुहूर्तमेढ रोवली गेली. सामूहिक प्रयत्नांतून हे संमेलन साहित्यिक वैभव, सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक जाणीव यांचा अविस्मरणीय सोहळा ठरविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.




