CSIR-NET परीक्षेत मुस्कान तडवीचे उल्लेखनीय यश
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१; आदिवासी तडवी समाजातून अशी कामगिरी करणारी पहिली विद्यार्थिनी ठरल्याचा गौरव
भुसावळ | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील रहिवासी तथा सावदा येथे LIC मध्ये कार्यरत असलेले श्री. राजू तडवी यांची कन्या कु. मुस्कान राजू तडवी हिने CSIR-NET (Life Sciences) जून २०२६ परीक्षेत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मुस्कानने मेहनत, जिद्द, बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारासह संपूर्ण तडवी समाजाचा गौरव वाढला आहे.

विशेष म्हणजे, आदिवासी तडवी समाजातून CSIR-NET जीवन विज्ञान परीक्षेत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१ मिळविणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरल्याचा गौरव तिच्या नावावर जमा झाला आहे. तिच्या या यशामुळे समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.
मुस्कानच्या उल्लेखनीय यशाबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात तिने अशीच उत्तुंग भरारी घेत भविष्यात यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, पिता-पुत्री दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे. ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर, विमा प्रतिनिधी सौ. संगीता प्रशांत बोरकर, सलीम तडवी, अमित तडवी, LIC अधिकारी नवज्योत सिंग सिसोदिया, संजय चौधरी, रशीद तडवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुस्कान तडवी आणि तिचे वडील राजू तडवी यांचे अभिनंदन केले आहे.




