विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांची हाणामारी; युवासेना आक्रमक!
दारूच्या नशेत धिंगाणा व विद्यार्थ्यांना मारहाणीचा आरोप; शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देण्याचा इशारा
धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकाजवळील शासकीय विद्यानिकेतन शाळा व वसतिगृह परिसरात शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षक दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा तसेच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणी युवासेना आक्रमक झाली असून, संबंधित शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंची भेट घेत हाणामारीचा व्हिडिओ दाखविला. यावेळी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदनही देण्यात आले. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शासकीय विद्यानिकेतन शाळा व वसतिगृह परिसरात दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. त्यानंतर दोन शिक्षकांमध्ये नशेच्या अवस्थेत वाद होऊन एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शाळा व वसतिगृह परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. वारंवार घडणाऱ्या प्रकारांमुळे शासकीय संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही युवासेनेने केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी शाळा व वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे. संबंधित प्रकाराचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करत सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी युवासेनेने केली आहे. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, शहराध्यक्ष अमित खंडेलवाल, दत्ता शिंदे, चेतन धामेच्या, सनी मोरे, जाविद बेग, अनिल ठाकूर, तुषार सातपुते, साहिल चित्ते, सागर पाटील, नितीन धनगर, भूषण पाटील, जिया अन्सारी, आदेश मराठे, प्रीतम धात्रक, सुमित चौधरी, प्रवीण मराठे, गगन पाटील, भूषण मिस्त्री, विशाल पाटील, दिगंबर कासार, कल्पेश चौधरी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




