तीन मागण्यांसाठी जळगावात ४ ऑक्टोबरला ‘संविधान आक्रोश तिरंगा रेल रोको’ आंदोलन
२१ सप्टेंबरला जळगाव व भुसावळ येथे पत्रकार परिषद आणि जिल्हास्तरीय बैठका
जळगाव : ‘उपवर्गीकरण नको’, ‘ईव्हीएम नको’ आणि ‘दादर चैत्यभूमीचे नामांतर करा’, या तीन मागण्यांसाठी संविधानवादी व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जळगाव येथे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘संविधान आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता हे आंदोलन होणार असून, आंदोलनस्थळ म्हणून जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी जिल्हास्तरावर विविध संघटनांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव येथील महेंद्र हॉटेल येथे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद तसेच जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर भुसावळ येथील संविधान भवन, भीमालय केंद्रीय कार्यालय येथे सायंकाळी ६ वाजता जिल्हाव्यापी पत्रकार परिषद व बैठक होणार आहे. ऑल इंडिया संविधान आर्मीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून, विविध १० संघटनांचे पदाधिकारी, संविधानवादी व आंबेडकरवादी कार्यकर्ते तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
आंदोलनाच्या पुढील नियोजनावर तसेच तीन मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. संविधानवादी संघटना, आंबेडकरवादी व आरक्षणवादी कार्यकर्ते आणि संबंधित समाजातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
