विविध शासकीय विभागांच्या वतीने जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान अभियान
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसेच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
यासंदर्भात संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेने पात्र लाभार्थ्यांचा शोध घ्यावा. तसेच त्यांना आवश्यक शासकीय दाखले व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेचा लाभ
‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाने पुढाकार घ्यावा, असेही निर्देश देण्यात आले.
केंद्र शासनाच्या निधीव्यतिरिक्त आवश्यक असलेली तफावत जिल्हा नियोजन समिती अथवा सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या निधीतून पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पात्र कुटुंबांना ही योजना संपूर्ण अनुदानावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्याचा उपक्रम
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने आणि प्रचलित नियमांनुसार उपलब्ध धान्य गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.
या उपक्रमाचाही ‘सेवा संकल्प अभियानात’ समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
