पाळधी (ता. धरणगाव) : महावितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्याला बसला आहे. पाळधी येथील पारधी शिवारात गट क्रमांक ३७८ मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी योगेश सतीश पाटील यांचा सुमारे दोन ते अडीच एकरांवरील गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील विद्युत तारा सैल व जीर्ण अवस्थेत असल्यामुळे अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, पाळधी शिवारातील शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीमुळे आग अधिक पसरू न देता आटोक्यात आणण्यात आली, अन्यथा आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.
या आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकरी योगेश पाटील यांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
