वाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा
बांबू पूजनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; औषधी व पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश
वाकोद, दि. १८ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथील जैन फार्ममध्ये जागतिक बांबू दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बांबू पूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच बांबूचे पर्यावरणीय, औषधी आणि मानवी जीवनातील महत्त्व याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी १९८९ मध्ये वाकोद जैन फार्म येथे १० बाय १० अंतरावर ‘मानवेल’ या वाणाच्या बांबूची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली होती. बांबूविषयी त्यांना विशेष आस्था होती. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमधून त्यांनी बांबूचे महत्त्व अधोरेखित केले होते. “बांबू मला दृढनिश्चयाचं प्रतीक वाटतो. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा बांबूपासून मिळते,” असे विचार त्यांनी व्यक्त केले होते.
वाकोद येथील फार्ममध्ये बांबूच्या वाढीचे निरीक्षण करण्यात आले असून, २४ तासांत ९ ते १२ इंच वाढ झाल्याची नोंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बांबू ही वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींपैकी एक असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व मोठे आहे. बांबूची लागवड, त्याचा उपयोग तसेच कार्बन शोषणातील संभाव्य योगदान याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
बांबूच्या कोंबांचा आहारातील उपयोग, त्यापासून तयार होणारे लोणचे आणि भाजी तसेच पारंपरिक औषधी उपयोग याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. “मानवी जीवनात बांबूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असे वाकोद फार्मचे वरिष्ठ व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी सांगितले.
कार्यक्रमात गणपत शेळके, सौ. करुणाबाई शेळके आणि विनोदसिंह राजपूत यांच्या हस्ते बांबू पूजन करण्यात आले. यावेळी संदीप बावस्कर, संतोष वानखेडे, विजय सपकाळे, चेतन धामोडे, सीमा जाधव, लताबाई जवखेडे, मीराबाई कुरंगे, रेणुकाबाई पाटील, रेखाबाई जाधव आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासोबतच बांबूच्या विविध उपयोगांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे आणि हरित संस्कृतीला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. जैन इरिगेशनच्या सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
