पाचोरा महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर पथनाट्य
‘सत्यशोधक मेळा’तून महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या युगातील समर्पकता प्रभावीपणे मांडली
पाचोरा (किशोर रायसाकडा) : क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे अमळनेर ग्रुपच्या वतीने ‘सत्यशोधक मेळा’ या पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी लेखन केलेल्या या पथनाट्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याबरोबरच त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या विचारांची आणि आजच्या काळातील समर्पकतेची मांडणी करण्यात आली.
अमळनेरच्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, शिक्षक डी. ए. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक संजय पाटील, दिशाताई संदानशिव, गायिका सुनीताताई मोरे, माधुरीताई पाटील, मुख्याध्यापिका निवेदिताताई कापडणेकर तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत भारतीताई कोळी यांनी पथनाट्यातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर केला.
महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देताना त्यांच्या विचारांची आजच्या सामाजिक परिस्थितीशी सांगड घालण्यात आली. पथनाट्याच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नितीन पाटील तसेच आर. एस. ठाकूर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी गो. से. हायस्कूलचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बापूसाहेब डॉ. बी. एन. पाटील, नंदू सोनार, प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. शरद पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, प्रा. डॉ. कमलाकर इंगळे, प्रा. डॉ. योगेश पुरी, प्रा. डॉ. माणिक पाटील, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, प्रा. संदीप टोपले यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
