शिक्षिकेविरोधात पालक आक्रमक; सभेत घुसून संस्थाचालकांना जाब
माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद शैक्षणिक संस्थेवर मोर्चा; निलंबनासह एसआयटी चौकशीची मागणी
धुळे : पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन पालकांशी अरेरावी केल्याचा आरोप असलेल्या शिक्षिकेविरोधात कारवाईच्या मागणीसाठी पालक आक्रमक झाले. माजी उपमहापौर तथा भाजपा नगरसेविका कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पालकांनी जय हिंद शैक्षणिक संस्थेवर मोर्चा काढत संस्थेच्या सुरू असलेल्या सभेत प्रवेश केला आणि पदाधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. यामुळे काही काळ संस्थेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या घेऊन जय हिंद शैक्षणिक संस्थेत भेटीसाठी गेलेल्या माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर व काही पालकांचा संबंधित शिक्षिकेसोबत वाद झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन संस्थाचालकांकडून देण्यात आले होते.
मात्र, आश्वासनानंतरही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत पालकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. संबंधित शिक्षिकेचा कथित मुजोरपणा वाढल्याचा आरोप करीत कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी संस्थेवर मोर्चा काढला.

मोर्चेकरी पालक थेट संस्थेच्या सभेत पोहोचल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षिकेचे कथित वर्तन आणि याप्रकरणी संस्थेने केलेल्या कारवाईबाबत पदाधिकाऱ्यांकडे जाब विचारला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकरी महिलांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, संबंधित शिक्षिकेचे कायमस्वरूपी निलंबन करण्याबरोबरच संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर तथा भाजपा नगरसेविका कल्याणी अंपळकर यांनी केली आहे.
पालकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता जय हिंद शैक्षणिक संस्था संबंधित शिक्षिकेविरोधात नेमकी कोणती कारवाई करते, याकडे पालकांसह शहराचे लक्ष लागले आहे.
