नवी दिल्लीत ‘आयईआय अवॉर्ड २०२६’मध्ये पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेजचा बहुमान
राष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्तेचा ठसा; दिल्लीतील भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान
मलकापूर (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘आयईआय अवॉर्ड २०२६’ने गौरव करण्यात आला. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) यांच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील लोधी रोड येथील स्कोप कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाविद्यालयाला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) यांच्या वतीने उद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी १८ वा आयईआय इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड २०२६ आणि ५ वा आयईआय इंजिनिअरिंग एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०२६ असा संयुक्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. देशभरातील नामांकित अभियांत्रिकी संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
‘आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल इंडिया’वर मंथन
‘आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल इंडिया : आत्मविश्वासाने स्वयंपूर्णतेकडे’ या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात अभियांत्रिकी शिक्षण, उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा, कौशल्य विकास आणि भारताच्या जागतिक औद्योगिक वाटचालीवर विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. अंजू राठी राणा, माजी इंजिनिअर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग आणि डीटीडीएफच्या संचालक निधी बन्सल हे मान्यवर उपस्थित होते. एनसीव्हीईटीचे संचालक डॉ. संदीपन नारोटे यांनी मार्गदर्शनपर मुख्य भाषण केले.
पॅनेल चर्चेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, एचएलएल लाईफकेअर, होल्टेक कन्सल्टिंग आणि जे. के. टायर्स यांसारख्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अभियांत्रिकी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी स्वीकारला पुरस्कार
या राष्ट्रीय सोहळ्यात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी डीन प्रा. आर. एम. चौधरी आणि इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने यांनी सहभाग घेत पुरस्कार स्वीकारला.
दिल्ली दौऱ्यादरम्यान महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी विविध उद्योगांचे प्रतिनिधी, सेंटर ऑफ एक्सलन्स, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नोडल अधिकारी तसेच नामांकित अभियांत्रिकी संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधला. या चर्चेत महाविद्यालयाचा स्वायत्त दर्जा, नवीन शैक्षणिक उपक्रम, उद्योग-संस्था सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सहा महिन्यांच्या अनिवार्य इंटर्नशिपवर विशेष भर देण्यात आला.
या संवादातून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार आणि इंटर्नशिपच्या संधी वाढविण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासोबत शैक्षणिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवीन शक्यता निर्माण झाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
व्यवस्थापनाकडून अभिनंदन
राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार सुधीर पाचपांडे आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, प्रा. आर. एम. चौधरी, प्रा. जयप्रकाश सोनोने तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल भविष्यातील शैक्षणिक विस्तारासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.
