पोलीस भरती इच्छुकांसाठी मोगलाईच्या राजा गणेश मंडळाची सराव परीक्षा
धार्मिक कार्यासोबत शैक्षणिक उपक्रम; २०० तरुण-तरुणींचा सहभाग
धुळे : पोलीस भरतीसह विविध शासकीय सेवांमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ओम तरुण मित्र मंडळ प्रणित ‘मोगलाईचा राजा’ गणेश मंडळातर्फे सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात धुळे शहरासह जिल्ह्यातील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.
धुळे शहरातील मोगलाई परिसरातील मोगलाईचा राजा गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विविध शासकीय पदांसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक उत्सवासोबत शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
सराव परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला १०० गुणांचा पेपर देण्यात आला होता. तब्बल दीड तास विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडविली. स्पर्धा परीक्षेची प्रत्यक्ष परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना स्वतःची तयारी तपासता यावी, वेळेचे नियोजन करता यावे आणि परीक्षेचा सराव व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या वतीने बक्षिसेही ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ३१०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११०० रुपये, तर विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांकासाठी १५०० रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ११०० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष सराव करण्याची संधी मिळाल्याने सहभागी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
‘मोगलाईचा राजा’ गणपती नवसाला पावतो, अशी मंडळाच्या कार्यकर्त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात विद्यार्थीहिताबरोबरच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मोरे, उपाध्यक्ष कांतीलाल मोरे, खजिनदार लकी मोरे, विपुल मोरे, मुकेश खेडकर, पंडित मोरे, मयूर मोरे, ईश्वर मोरे, बंटी मोरे, हरीश मोरे, गोविंद मोरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
