श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या महाभंडाऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
११ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; २०० सेवेकऱ्यांकडून निस्वार्थ सेवा
पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील : पारोळा शहरातील आजाद चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाभंडारा सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या प्रसंगी आमदार अमोलदादा पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना शहरप्रमुख गटनते, नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष सुदामभाऊ चौधरी, कैलासभाऊ चौधरी, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, नगरसेवक भूषण टिपरे, शहरप्रमुख अण्णा चौधरी, भागवतअण्णा चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठ वर्षांची सेवाभावी परंपरा
श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ गेल्या आठ वर्षांपासून उत्साहाने आणि परिश्रमपूर्वक गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने निर्माण केली आहे.
गणेशोत्सव काळात भजन, कीर्तन, खानदेशी गीतांचे कार्यक्रम, समाजप्रबोधनपर व्याख्याने यांसह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
११ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसाद
मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य महाभंडारा हा गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरतो. यंदाच्या महाभंडाऱ्यात ११ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नियोजनबद्ध आयोजन आणि सेवाभावी कार्याची ही पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
२०० सेवेकऱ्यांकडून निस्वार्थ सेवा
मंडळाच्या विविध सेवाकार्यात २०० हून अधिक सेवेकरी गणेशोत्सव काळात निस्वार्थ भावनेने योगदान देतात. महाप्रसाद वितरणासह विविध उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन सेवेकऱ्यांकडून केले जाते.
मोठ्या संख्येने युवकांना एकत्र आणून त्यांच्यात सेवा, सामाजिक बांधिलकी आणि संघटनभावना निर्माण करण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा उत्सव ठरत असल्याचे मंडळाच्या कार्यातून दिसून येते.