भालोद गाव खुनाच्या घटनेने हादरले; तरुणाची दगडाने ठेचून हत्या
पार्टीदरम्यान किरकोळ वादातून हत्येचा संशय; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, एकाचा शोध सुरू
फैजपूर | प्रतिनिधी : अक्षय वाघ
यावल तालुक्यातील भालोद गावात गावालगतच्या एका वाड्यात पार्टीदरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भालोद गावालगत असलेल्या प्रशांत भालेराव यांच्या वाड्यात चार मित्र पार्टीसाठी जमले होते. यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन रमेश डोंबरसिंग भामर (वय ४०) यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, अधिक पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.
या प्रकरणात पोलिसांनी सूरज वासुदेव कोळी (वय २७) आणि सूरज प्रमोद नेमाडे (वय ३७, रा. चिखली दरवाजा) या दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर आणखी एक संशयित फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडबुजर, फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक संदीप रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हत्येचे नेमके कारण, घटनेतील सर्वांची भूमिका आणि हल्ल्यात वापरण्यात आलेले साहित्य याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे भालोदसह संपूर्ण यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
