जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा!
शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत बेमुदत उपोषणाचा इशारा
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
खरीप हंगामात पावसाने लांबविलेली दडी, पिकांवर आलेली रोगराई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत द्यावी, अशी मागणी स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले.
यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवातच तुरळक पावसाने झाली. पावसाने तब्बल २५ ते ३० दिवस उशिराने हजेरी लावल्याने पेरण्यांवर परिणाम झाला. त्यानंतर काही काळ पाऊस झाला असला तरी गेल्या महिनाभरापासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. हवामान अभ्यासक व तज्ज्ञांनी यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अनेक भागांत त्याची झळ जाणवत असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
पावसाच्या लहरीपणाचा पिकांना मोठा फटका
शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच पदरमोड करून बियाणे, खते, औषधे, फवारणी, निंदणी आणि मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र, पावसाने ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पाठ फिरवल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघण्याची शक्यता कमी झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे उत्पन्नाची आशा मावळत असताना दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाकडून या गंभीर परिस्थितीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
मागील वर्षाची विमा भरपाईही रखडली
शेतकरी संघटनेने मागील वर्षाच्या पीकविमा आणि नुकसानभरपाईचा मुद्दाही उपस्थित केला आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा व नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा दावा संघटनेने केला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या नैसर्गिक संकटासोबतच जुन्या आर्थिक अडचणींचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या
शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये—
-
जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
-
बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये दुष्काळी मदत द्यावी.
-
कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७० हजार रुपये मदत द्यावी.
-
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
-
खरीप हंगामातील सर्व पिकांची पीकविमा भरपाई मंजूर करावी.
-
शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे.
-
नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण
शेतकरी संघटनेच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. पुढील १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा व तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकन पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, सुनील पाटील, गुलाब पाटील, प्रमोद शहा, विकास भदाणे, संदीप पाटील, जगदीश मनोरे, रामकृष्ण मराठ, पुरुषोत्तम अहिरे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, नारायण पाटील, रोहिदास पाटील, शांताराम पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
