खिर्डी घरफोडी प्रकरणातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
निभोरा पोलिसांची कारवाई; ५ लाख ८९ हजार ३१० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त
निभोरा | अक्षय वाघ (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी येथे १४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात निभोरा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खिर्डी येथील घरफोडीच्या घटनेत तब्बल ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी निभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना रावेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) अनिल बडबुजर, निभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मीना देशमुख आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती तसेच विशेष तपास यंत्रणेच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडून ५ लाख ८९ हजार ३१० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खिर्डी येथील घरफोडीचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
आणखी दोन घरफोड्यांची उकल
पोलिसांनी तपास अधिक गतिमान केल्यानंतर ताब्यातील आरोपींकडून आणखी दोन घरफोड्यांबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांशी संबंधित १ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल तसेच ३७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांच्या तपासाला वेग आला असून, ताब्यातील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक मीना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणेला महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत.
