५१०० नारळांपासून साकारली १८ फूट उंच गणरायाची भव्य मूर्ती!
लक्ष्मीनगरमधील ‘जय श्री राम’ बहुउद्देशीय संस्थेच्या गणेश मंडळाचा पर्यावरणपूरक उपक्रम; मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)
जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील ‘जय श्री राम’ बहुउद्देशीय संस्था, गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त अनोखा आणि भव्य उपक्रम साकारला आहे. तब्बल ५ हजार १०० नारळांचा वापर करून १८ फूट उंच गणरायाची पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली आहे. नारळांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेले हे गणरायाचे भव्य रूप नागरिकांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, ही आकर्षक आरास पाहण्यासाठी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीच्या निर्मितीसाठी तरसोद येथील प्रसिद्ध गणपती मंदिर, इच्छादेवी गणपती मंदिर, भवानीमाता मंदिर तसेच परिसरातील भाविक भक्तांनी श्रद्धेने नारळ जमा करून दिले. भाविकांच्या सहभागातून जमा झालेल्या हजारो नारळांचा कलात्मक वापर करून गणरायाची ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
ही विशाल आणि नयनरम्य मूर्ती पूर्ण करण्यासाठी भरत भाऊ बाविस्कर, श्रवण खेडकर आणि ओम मिस्तरी यांनी तब्बल १८ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला भाविकांच्या सहभागाची जोड मिळाल्याने नारळांपासून साकारलेली ही मूर्ती गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली आहे.
नारळांची आकर्षक मांडणी, मूर्तीचे भव्य स्वरूप आणि पर्यावरणपूरक संकल्पना यामुळे या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व भाविकांकडून भरभरून कौतुक होत आहे. पारंपरिक भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘भक्तीही आणि पर्यावरणाची जपणूकही’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष भरत भाऊ बाविस्कर व उपाध्यक्ष उल्हास चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या नारळांचा विधायक व कलात्मक वापर करून गणरायाची ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
५१०० नारळ… १८ फूट उंची… १८ दिवसांची मेहनत आणि भक्तीचा अनोखा आविष्कार! त्यामुळे लक्ष्मीनगरमधील हा पर्यावरणपूरक गणराय यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.
