दुष्काळ, नापिकी आणि शेती कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या
येवतीतील ४८ वर्षीय काशीनाथ बावस्कर यांचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर मृत्यू; तीन मुलींच्या कुटुंबाला शासकीय मदतीची मागणी
बोदवड : येवती, ता. बोदवड येथील शेतकरी काशीनाथ मारोती बावस्कर (वय ४८) यांनी दुष्काळी परिस्थिती, नापिकी आणि शेती कर्जाच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बावस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शासनाने निकषांनुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी त्यांच्या मुलींनी तहसीलदारांकडे अर्जाद्वारे केली आहे.
काशीनाथ बावस्कर यांची येवती शिवारातील गट क्रमांक २८३ मध्ये शेती होती. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याची चिंता त्यांना होती. त्यातच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत ते असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर रविवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बावस्कर यांच्या पश्चात तीन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी दिव्यांग आहे. त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने तीनही मुलींसमोर उदरनिर्वाह, शिक्षण आणि भविष्यातील आर्थिक गरजांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर आरती काशीनाथ बावस्कर, मंगला काशीनाथ बावस्कर आणि लक्ष्मी काशीनाथ बावस्कर यांनी तहसीलदारांकडे अर्ज सादर केला आहे. दुष्काळ व नापिकीच्या परिस्थितीमुळे वडिलांनी आत्महत्या केल्याने शासनाच्या निकषांनुसार या प्रकरणाची चौकशी करून पात्रतेनुसार कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत व इतर उपलब्ध योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोरील नापिकी, कर्जफेड आणि आर्थिक असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणेने प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबाला नियमानुसार मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे.
