न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहात
विविध स्पर्धा, उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ११०० मोदकांचा गणरायाला नैवेद्य
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि कौशल्यविकासात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सवाची सुरुवात विद्यार्थी बालमंडळाच्या स्थापनेने झाली. यामध्ये अध्यक्षपदी चित्राक्षी चौधरी, उपाध्यक्षपदी ज्ञानिका पाटील, खजिनदारपदी ज्ञानदा चौधरी, सचिवपदी गितेश चव्हाण, तर सहसचिवपदी स्वराज भावसार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर बालमंडळाचे सहसचिव स्वराज भावसार यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.
उत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेसाठी एकूण १२ गट करण्यात आले होते. यामध्ये गट क्रमांक ४ मधील मृणाल चौधरी व डिंपल रोटे तसेच गट क्रमांक ८ मधील चित्राक्षी चौधरी व चैताली पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गट क्रमांक ८ मधील देवेंद्र भोई व रुद्र चौधरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

गीत गायन स्पर्धेत करण महाजन याने प्रथम, देवेंद्र भोई याने द्वितीय, तर गितेश चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला.
मोदक बनविण्याच्या स्पर्धेत इयत्ता तिसरीतील यश पाटील, जिग्नेश मराठे व निशा चौधरी तसेच इयत्ता चौथीतील चित्राक्षी चौधरी, पूर्वजा नारखेडे व स्वराज भावसार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद मिळविले.
गणेशोत्सवाच्या काळात शाळेच्या परिपाठामध्ये दररोज श्री गणेशाच्या गोष्टी, भक्तिगीते तसेच विविध संस्कारक्षम उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आनंदासोबतच भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची ओळख करून देण्यात आली.

भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप
गणेशोत्सवाच्या सांगता प्रसंगी श्री गणेशमूर्तीचा विसर्जन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रंगीबेरंगी पोशाखातील विद्यार्थी, ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी श्री गणरायाची आरती करून भावपूर्ण निरोप दिला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या तब्बल ११०० मोदकांचा श्री गणरायाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर या मोदकांचे सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष तथा नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक ॲड. प्रदीप देशपांडे, जितेंद्र महाजन, नशिराबाद केंद्राचे केंद्रप्रमुख राहुल संसारे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, माध्यमिक उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाचपांडे तसेच माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, बंधुभाव, शिस्त, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या मूल्यांची रुजवणूक करण्यात आली. तसेच उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन स्वाती रोटे, दीपमाला सपकाळे, संगीता जोशी व जयश्री चौधरी यांनी केले. मुख्याध्यापक प्रविण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
अखेर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
