अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम
‘गुलामगिरी’ हा सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा; अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होण्याचे आवाहन
धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव : तालुक्यातील अनोरे येथे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांचे वडील निसर्गवासी दत्तू हरी महाजन यांच्या दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा विधी सत्यशोधक पद्धतीने पार पडला. पारंपरिक कर्मकांडाला फाटा देत सामाजिक प्रबोधन, महापुरुषांचे विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक पद्धतीने विधी पार पाडताना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांच्या मार्गाने समाजाने वाटचाल करणे गरजेचे आहे. शिक्षण हे मानवमुक्तीचे प्रभावी साधन असून, महात्मा ज्योतिराव फुले लिखित ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे, असे त्यांनी सांगितले. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने विवाह, दशक्रिया विधी, गृहप्रवेश आदी सामाजिक विधी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तसेच ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चॅनेलवरील सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्यावरील मालिका सहकुटुंब पाहावी आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा खरा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन पी. डी. पाटील यांनी केले.
सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनीही सत्यशोधक विचारांची गरज स्पष्ट करत सामाजिक परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक उपक्रमांना चालना देण्याचे आवाहन केले. माळी समाजाध्यक्ष हरी महाजन आणि सरपंच स्वप्निल महाजन यांनी मनोगत व्यक्त करून निसर्गवासी दत्तू हरी महाजन यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
या सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार आणि सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पितरांच्या स्मरणार्थ महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोकडे परिवाराच्या माध्यमातून शेत परिसरात लिंब, पिंपळ आणि वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे श्रद्धेसोबत सामाजिक प्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी मधुकर नामदेव देशमुख (उपाध्यक्ष, बी. जे. विद्यालय), हरी तुकाराम महाजन (माळी समाजाध्यक्ष), स्वप्निल लक्ष्मण महाजन (सरपंच), भाऊसाहेब संभाजी पाटील (पोलीस पाटील), ज्ञानदेव राजाराम पाटील (विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन), रवींद्र लोटन चव्हाण, त्र्यंबक रोकडे, रघुनाथ रोकडे, नामदेव रोकडे, सुरेश रोकडे, संतोष रोकडे, राजेंद्र रोकडे यांच्यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
