येवतीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आमदार चंद्रकांत पाटील यांची आर्थिक मदत
कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन; तीन मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन
बोदवड (प्रतिनिधी) : तालुक्यातील येवती येथील शेतकरी स्व. काशिनाथ मारुती बावस्कर यांच्या कुटुंबीयांची आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात तातडीची आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
काशिनाथ बावस्कर यांच्या निधनामुळे त्यांच्या तीन मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या आईचेही निधन झाल्याने तिन्ही मुलींनी आई-वडिलांचे छत्र गमावले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला.
कुटुंबातील ज्येष्ठ कन्या कु. आरती काशिनाथ बावस्कर यांच्याकडे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. हितेश पाटील यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेण्यात आली.
तीन मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन
तिन्ही मुलींच्या पुढील शिक्षणासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांच्या भविष्यासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी काशिनाथ बावस्कर यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाला तातडीची मदत आणि पुढील आधाराची गरज असल्याची बाब स्थानिक पातळीवर चर्चेत आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा बावस्कर, मुक्ताईनगरचे डीवायएसपी श्री. गावित, बोदवड तहसीलदार श्री. सपकाळे, बोदवड पोलीस निरीक्षक श्री. लवंगडे यांच्यासह शिवसेना, युवासेना व भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत मिळाल्याने तसेच मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय मदतीचे आश्वासन मिळाल्याने कुटुंबाला पुढील काळात आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
