कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची जाळून हत्या!
गरताडबारीतील गुन्ह्याचा तीन दिवसांत उलगडा; चौघांना अटक, दोघे फरार, दोन महिला आरोपींचा समावेश
धुळे (प्रतिनिधी) : कला केंद्रातील अंतर्गत वादातून रायगड येथील गर्भवती महिलेची बीड येथे मारहाण करून बेशुद्ध केल्यानंतर धुळे तालुक्यातील गरताडबारी परिसरात पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याचा प्रकार पोलिस तपासातून समोर आला आहे. मोहाडी पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत तपास करून चार आरोपींना अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
मृत महिलेचे नाव पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
संशयित वाहनाच्या आधारे तपासाला दिशा
घटना उघडकीस आल्यानंतर मोहाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची सलग सुमारे अकरा तास तपासणी केली. या तपासादरम्यान हुंदाई मोबिलिओ (क्रमांक एमएच ४३/एआर ४०७०) या संशयित वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
वाहनाच्या तपासातून पोलिसांनी धाराशिव व अहिल्यानगर परिसरात तपासाची दिशा वळवली. त्यानंतर कला केंद्रात काम करणाऱ्या दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीडमध्ये मारहाण; गरताडबारीत हत्या केल्याचा तपासातील दावा
पोलिसांच्या तपासानुसार, कला केंद्रातील अंतर्गत वादातून आरोपींनी बीड येथे संबंधित महिलेला मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी राजस्थानच्या दिशेने निघाले. प्रवासादरम्यान धुळे जिल्ह्यातील गरताडबारी परिसरात महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे.
या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेज, संशयित वाहन आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघांना अटक; दोघांचा शोध सुरू
या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी
-
सर्फराज ऊर्फ शफिक अलीम मोमिन (३८), धाराशिव
-
आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (३१), धाराशिव
-
स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (२८), अहिल्यानगर
-
लक्ष्मी बालाजी पवार (३०), धाराशिव
या चौघांना अटक केली आहे.
तर फारुख शेख (धाराशिव) आणि रोहिणी जाधव (छत्रपती संभाजीनगर) हे दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची कार्यवाही केली.
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, हत्येमागील नेमका वाद, आरोपींची भूमिका आणि घटनेतील इतर बाबींचा तपास मोहाडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
