धुळ्यात दोन गटांत वाद; चार राऊंड फायरिंग अन् शस्त्रांचा धाक
आग्रा रोडवरील मनोहर चित्रपटगृहासमोर थरार; हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद
धुळे प्रतिनिधी :
धुळे शहरातील आग्रा रोडवरील मनोहर चित्रपटगृहासमोर दोन गटांत झालेल्या वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. या वादादरम्यान चार राऊंड फायरिंग झाल्याचा दावा असून, काही तरुणांनी शस्त्रे बाहेर काढल्याने परिसरात खळबळ उडाली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा रोडवरील एका व्यावसायिक ठिकाणी हर्षल दीपक गवळी आणि त्याचा भाऊ राज दीपक गवळी यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हर्षल गवळी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात गोलू मेकले आणि भावेश किर्लोस्कर यांच्यासह चार ते पाच तरुणांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केल्याचा दावा असून, त्यानंतर शस्त्रे दाखवत घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
घटनास्थळावरून गोळीबाराचे अवशेष जप्त
गोळीबार झालेल्या ठिकाणी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष आढळून आले. पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या घटनेमागे उधारीचा व्यवहार असल्याची प्राथमिक चर्चा असली, तरी वादाचे नेमके कारण काय होते, याबाबत विविध चर्चा घटनास्थळी सुरू होत्या. त्यामुळे हल्ल्यामागील वास्तविक कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध
घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
