अशोक सूर्यवंशी यांना तीन राज्यस्तरीय पुरस्कारांचा बहुमान
आदर्श शिक्षक, जीवनगौरव आणि आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरव; संपादक आबासाहेब शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार
कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नूतन मराठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सुप्रसिद्ध निवेदक, पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते अशोक विश्वनाथ सूर्यवंशी यांना लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात तीन प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अशोक सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ आणि राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष दत्ता गाडगे, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा संगम
अशोक सूर्यवंशी हे शिक्षण, पत्रकारिता, निवेदन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबतच सामाजिक जनजागृती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ते करीत आहेत.
मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, प्रभावी निवेदक म्हणून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग तसेच पत्रकार म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न या विविध कार्यांची दखल घेत त्यांना तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
एकाच व्यासपीठावर तीन पुरस्कारांचा सन्मान
शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार, विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार, तर पत्रकारितेतील कार्याबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकाच सोहळ्यात तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव झाल्याने अशोक सूर्यवंशी यांच्या कार्याची विविध क्षेत्रांतून दखल घेतली गेल्याचे चित्र आहे.
या तिहेरी सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अशोक सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सूर्यवंशी यांनी लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाचे आभार व्यक्त केले. मिळालेला हा सन्मान भविष्यात शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
