दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबवा
भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पीकविमा, चारा छावण्या, रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन आणि शेतकरी योजनांबाबत विविध मागण्या
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव : भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, तसेच भडगाव येथील गिरणा नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.
भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, जिजाबराव पाटील, रत्नाकर पाटील आणि बापुराव पाटील यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
गिरणा नदीपात्रातील वाळू उपशावर कारवाईची मागणी
निवेदनात भडगाव येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा उपशामुळे भविष्यात भूजल पातळीवर परिणाम होऊन शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भूमिका किसान मोर्चाने मांडली. त्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी २०२६ चा जिल्हा सर्वेक्षण अहवाल तसेच २०२६-२७ साठी वाळू गटांच्या ई-निविदा व ई-लिलावासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पीकविमा व दुष्काळी मदतीची मागणी
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित पीकविम्याची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शिल्लक ज्वारीची खरेदी पूर्ण करावी. आगामी रब्बी हंगामासाठी वाघूर व गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
तार व केबल चोरीला आळा घालण्याची मागणी
भडगाव व जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या तार व केबल चोरीच्या घटना वाढल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित चोरट्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी किसान मोर्चाने केली.
भडगावसह जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने पशुधनाचे नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पीएम किसान, फार्मर आयडीच्या अडचणी दूर करण्याची मागणी
२०२३ पासून वारसाहक्काने अथवा खरेदीद्वारे जमीन मिळविलेल्या काही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच फार्मर आयडी काढताना अडचणी येत असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी सोडवा
ई-पीक पाहणीमध्ये तलाठ्यांकडून पीकपेरा मंजूर झाल्यानंतरही पोर्टलवर मंजुरी दिसत नसल्याच्या तक्रारी असल्याचे किसान मोर्चाने म्हटले आहे. पीकपेरा नोंदविताना लॉगिन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणीही करण्यात आली.
कृषी विभागातील कर्मचारीसंख्या अपुरी असल्याचा दावा करत रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सौरपंप व पशुपालन कर्जाच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी
‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले सौर पॅनेल नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाल्यास कंपनीच्या हमीअंतर्गत त्यांची दुरुस्ती अथवा बदल करून देण्यात टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी कर्ज घेताना बँकांकडून लावण्यात येणाऱ्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर रोटे, मनोहर पाटील, सच्चिदानंद चव्हाण, किशोर नारखेडे, घनश्याम पाटील, किसन पाटील, जिल्हा चिटणीस अरुण पाटील, कुंदनसिंग पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष भरत पाटील, कैलास पाटील आणि प्रमोद पाटील यांच्यासह किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
