धुळ्याच्या २५ कुस्तीपटूंचा कोल्हापुरात होणार सन्मान
खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेऊन कुस्तीपटू कोल्हापूरकडे रवाना
धुळे प्रतिनिधी :
धुळे जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली असून, धुळे व जळगाव जिल्ह्यातील २५ प्रख्यात कुस्तीपटूंचा कोल्हापूर येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती परिषदेत सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कुस्तीपटूंनी खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरकडे प्रस्थान केले.
रवानगीपूर्वी कुस्तीपटूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. यावेळी कुस्ती क्षेत्रातील पदाधिकारी, माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ ऑक्टोबरला कोल्हापुरात राष्ट्रीय कुस्ती परिषद
आयोजकांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस महाराष्ट्रासह देशातील कुस्ती क्षेत्रातील मान्यवर व दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत धुळे व जळगाव जिल्ह्यातील कुस्तीपटूंच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे या सोहळ्याकडे खानदेशातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अनुभवी कुस्तीपटूंचा समावेश
कोल्हापुरात सन्मान होणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये प्रथम महापौर भगवान करणकाळ, पै. कल्याण गरुड, पै. राम कानडे, पै. गोरख पाटील, पै. जितू इखे, पै. अनिल थोरात, पै. बंटी पप्पया, पै. केतन जाधव, पै. मनोज घोडके, पै. गोपाल चौधरी, पै. विष्णू जावडेकर, पै. ज्ञानेश्वर फुलपगारे, पै. राजेंद्र देवरे, पै. जालिंदर जाधव, पै. छोटू शहा, पै. जगदीश सरोदे, पै. हंसराज माळी, पै. वसंत हरळ, पै. भूषण गायकवाड, पै. राहुल बागुल आणि पै. राजेंद्र गवळी यांचा समावेश आहे.
धुळे व जळगाव जिल्ह्यातील या कुस्तीपटूंच्या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर दखल घेतली जात असल्याने खानदेशातील कुस्ती क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा प्रसंग मानला जात आहे. त्यांच्या सन्मानामुळे नव्या पिढीतील कुस्तीपटूंनाही प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
