पिंप्री खुर्द येथील अंगणवाडी क्र. ४१७ मध्ये पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित
संतुलित आहार, स्वच्छता व आरोग्याबाबत बालकांसह पालकांमध्ये जनजागृती
धरणगाव प्रतिनिधी : पिंप्री खुर्द येथील आंबेडकर नगर, सोनवद रोड परिसरातील अंगणवाडी क्रमांक ४१७ येथे आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका अलका बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्य तसेच शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक पोषणमूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या वाढीच्या काळात त्यांना नियमितपणे सकस व पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असून, आहारामध्ये विविध पोषक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांची आरोग्य तपासणी, पूर्वप्राथमिक शिक्षण, पोषण आहार तसेच पालकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली.
या उपक्रमातून ‘सुदृढ बालक, निरोगी कुटुंब आणि सक्षम समाज’ या उद्देशाला बळ देण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका अलका बाळकृष्ण पाटील यांनी परिश्रम घेतले.
