‘एक तास महापुरुषांसाठी’ उपक्रमातून कुऱ्हा हरदो शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना अभिवादन
गांधी जयंती व शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा; चरित्रात्मक पुस्तकांच्या वाचनातून संस्कारक्षम उपक्रम
कुऱ्हा हरदो : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘एक तास महापुरुषांसाठी’ या उपक्रमातून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. वैशाली संसारे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना मुद्देसूद माहिती दिली. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ २ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने गांधीजींनी दिलेला संदेश आजही समाजासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत शास्त्री यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेच्या विचारातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
श्रीमती कुमुदिनी माहुरे यांनी विद्यार्थ्यांना अहिंसेचा मार्ग का स्वीकारला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. अहिंसा, सत्य, संयम आणि परस्पर सन्मान या मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी देवयानी सोनवणे, प्रगती माळी आणि पूजा पाटील या विद्यार्थिनींनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या भाषणातून प्रभावीपणे करून दिला.
महापुरुषांच्या चरित्रातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार
उपक्रमशील शाळा या संकल्पनेअंतर्गत महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त ‘एक तास महापुरुषांसाठी’ हा उपक्रम डॉ. वैशाली संसारे यांच्या संकल्पनेतून शाळेत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांची चरित्रात्मक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. महापुरुषांचे विचार, कार्य आणि जीवनसंघर्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि मूल्याधिष्ठित विचारांची रुजवण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
