घोटी-आहुर्ली मार्गे नाशिक बससेवा अखेर सुरू; गायकरांच्या पाठपुराव्याला यश
विद्यार्थी, कामगार व नागरिकांची गैरसोय दूर; सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या नव्या बसफेऱ्या सुरू
नाशिक जिल्हा प्रतिनिधी : नवनाथ गायकर
आहुर्ली : आहुर्ली-सांजेगाव मार्गे नाशिक हे जिल्ह्याचे शहर जवळ असतानाही या मार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या काही बसफेऱ्या बंद झाल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अखेर या प्रश्नाची दखल घेत आहुर्ली येथील माजी चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पाटील गायकर यांनी इगतपुरी आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने या मार्गावर नव्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
शुक्रवार, दि. २ ऑक्टोबरपासून या बससेवेला प्रारंभ झाला असून, त्यामुळे आहुर्ली, सांजेगाव आणि परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
वैतरणा येथून सकाळी ६ वाजता आहुर्लीमार्गे नाशिक ही जुनी मुक्काम बसफेरी कायम ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच नाशिकहून सकाळी ७ वाजता आहुर्ली, आहुर्लीहून सकाळी ८ वाजता नाशिक, दुपारी २ वाजता घोटीहून आहुर्लीमार्गे नाशिक, नाशिकहून दुपारी ३ वाजता आहुर्ली आणि आहुर्लीहून दुपारी ४ वाजता नाशिक अशा नव्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
या बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पाटील गायकर तसेच सांजेगाव येथील म.वि.प्र. संस्थेचे शिक्षक व कर्मचारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना नाशिककडे ये-जा करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध झाली आहे.
प्रवाशांची गैरसोय दूर
आहुर्ली परिसरातील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेत इगतपुरी आगारातील आगारप्रमुख शेख, अधिकारी ढाकणे, चोपडे व तळपडे आदींनी बसफेऱ्या सुरू करण्यासाठी कार्यवाही केली. बससेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी इगतपुरी आगाराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
नवीन बसफेऱ्यांचा विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
