गटस्तरीय क्रीडा स्पर्धेत राजा फांटा आश्रमशाळेच्या मुलींची खो-खोमध्ये हॅट्ट्रिक!
अंतिम सामन्यात सोन आश्रमशाळेवर दणदणीत विजय; प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड
धडगाव प्रतिनिधी : तालुक्यातील विविध शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच शासकीय आश्रमशाळा, चुलवड येथे उत्साहात पार पडल्या. १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या खो-खो स्पर्धेत राजा फांटा आश्रमशाळा, पाडामुंड येथील मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या विजयासह पाडामुंडच्या मुलींनी सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवत खो-खो स्पर्धेत हॅट्ट्रिक साधली आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील विविध आश्रमशाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासूनच पाडामुंडच्या खेळाडूंनी चपळता, वेग, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रभावी कामगिरी करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात शासकीय आश्रमशाळा सोन विरुद्ध राजा फांटा आश्रमशाळा पाडामुंड असा सामना रंगला. पाडामुंडच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखले. अखेर दणदणीत विजय मिळवत पाडामुंडच्या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
संघाची कर्णधार नेहा तडवी हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिला अमिषा पाडवी, माधुरी वळवी, सुनंदा तडवी, पार्वती वसावे, गुली तडवी, संजना तडवी, जला वळवी, सीमा तडवी, दक्षता वळवी, बबिता वळवी आणि चंदा वळवी यांनी दमदार सांघिक साथ दिली.
या शानदार कामगिरीमुळे पाडामुंड आश्रमशाळेच्या मुलींच्या संघाची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी स्पर्धेत हा संघ धडगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
संघाला क्रीडा शिक्षक बबन तडवी, चिंतामण वसावे, चेतन तडवी, वनसिंग तडवी, गणेश पाडवी आणि एस. एस. वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सरावासोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि सहकार्य संघाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरले.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी सांघिक भावना, चपळता, शिस्त, आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. सलग तिसऱ्या विजेतेपदामुळे पाडामुंड आश्रमशाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विजेत्या संघाचे संस्थाध्यक्ष ॲड. के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, सौ. हेमलता पाडवी, जि. प. सदस्या गिताताई पाडवी, मुख्याध्यापक पुष्पेंद्र गिरासे, ईश्वर भावसार, ज्येष्ठ शिक्षक दत्तु पाडवी, केशव मराठे, लिलेश सांळुके, प्रकाश सोनवणे, विजय कोठावदे, महेंद्र अहिरे, कमलसिंग वसावे, के. के. पावरा, हंसराज वाघ, रमेश साटोटे, प्रविण पाटील, वाड्या वळवी, कागीबाई पावरा, राजुबाई वळवी, हिराबाई भोई, गंगाबाई हुरेज आणि आठुबाई तडवी यांच्यासह पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
