निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत निशांत भैय्या तुपेरे यांचा वाढदिवस; शैक्षणिक साहित्याचे वाटप
बॅनरबाजी, डीजे आणि फटाक्यांचा खर्च टाळत सामाजिक बांधिलकीचा आदर्श; १०० विद्यार्थ्यांना वही, पेन, बिस्किटे व खाऊचे वाटप
जामखेड | अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी – बापूसाहेब घोडेस्वार
वाढदिवस म्हटला की बॅनरबाजी, डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी यावर होणारा अनावश्यक खर्च टाळत जामखेडचे युवा नेते निशांत भैय्या तुपेरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अॅड. अरुणआबा जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या निवारा बालगृह, जामखेड येथे विद्यार्थ्यांसोबत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून निवारा बालगृहातील सुमारे १०० विद्यार्थ्यांना वही, पेन यांसह शैक्षणिक साहित्य, बिस्किट पुडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी संतोषभाऊ गव्हाळे, राणाभाऊ सदाफुले, सुमित भालेराव आणि राजू फिटर यांनी मनोगत व्यक्त करून निशांत भैय्या तुपेरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच निवारा बालगृहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून व्यवस्थापनाचे आभार मानले.
विविध भागांतही सामाजिक उपक्रम
निशांत भैय्या तुपेरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत, जामखेड शहर, चुंबळी फाटा, हाळगाव आणि फक्राबाद यांसह विविध भागांतही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाचा उत्सव केवळ व्यक्तिगत आनंदापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
बालगृहातील सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम
निवारा बालगृहात सामाजिक उपक्रमांची परंपरा सातत्याने जपली जात आहे. गेल्याच महिन्यात जामखेड नगरपरिषदेचे सभापती तथा नगरसेवक संतोषभाऊ सदाफुले यांचा वाढदिवसही येथे साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राजू फिटर यांच्या वतीने निवारा बालगृहाला एक तांदळाचे पोते मदत म्हणून देण्यात आले होते. या उपक्रमाची आठवणही यावेळी उपस्थितांनी सांगितली.
मान्यवरांची उपस्थिती
या वाढदिवस सोहळ्याला सभापती तथा जामखेड नगरसेवक संतोषभाऊ गव्हाळे, जामखेडचे युवा नेते राणाभाऊ सदाफुले, नगरसेवक सुमित भालेराव, पत्रकार बापूसाहेब घोडेस्वार, प्रीतम घायताडक, राजू फिटर, सोमनाथ माने, अवधूत भालेराव, सनी समुद्र, ऋषी रंधवे तसेच निवारा बालगृहाचे शिंदे सर, सागर राजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निशांत भैय्या तुपेरे यांचा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
