रावेर पोलिसांची अवैध हातभट्टी दारूभट्ट्यांवर धडक; ८१ हजारांचा मुद्देमाल नष्ट
पाल, अंजदा व नेहता परिसरात कारवाई; हातभट्टी दारू व कच्चे-पक्के रसायन नष्ट, अवैध दारू निर्मात्यांना इशारा
रावेर | प्रतिनिधी – अक्षय वाघ : रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात रावेर पोलिसांनी धडक मोहीम राबवली. पाल, अंजदा व नेहता परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत गावठी हातभट्टी दारू, गुळ-मोह मिश्रित कच्चे व पक्के रसायन असा एकत्रित ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाल बिटमध्ये कारवाई
रावेर पोलीस ठाण्याच्या पाल बिट परिसरात ३० लिटर गुळ-मोह मिश्रित उकळते रसायन व ४० लिटर गुळ-मोह मिश्रित कच्चे रसायन, असा अंदाजे २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल नष्ट केला.
याच परिसरात कृष्णा मधुकर राठोड (वय २७, रा. पाल, ता. रावेर) याच्याकडून १५ लिटर गावठी हातभट्टी दारू, अंदाजे १ हजार ५०० रुपये किमतीची, आढळून आली. सदर दारूही पोलिसांनी नष्ट केली.
अंजदा बिटमध्येही धडक
अंजदा बिट परिसरात सुपडू भिवसन तायडे (रा. नेहता, ता. रावेर) याच्याकडून ३० लिटर गावठी हातभट्टी दारू, १०० लिटर गुळ-मोह मिश्रित कच्चे रसायन आणि १५० लिटर पक्के रसायन, असा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन तसेच तयार दारू व साहित्य जागेवरच नष्ट केले.
रावेर परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच सामाजिक वातावरणावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या आदेशानुसार एपीआय अमूल बच्छाव, पीएसआय मनोज महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख तसेच डीबी पथकाने ही कारवाई केली.
अवैध हातभट्टी दारू तयार करणारे व विक्री करणाऱ्यांनी तातडीने हा व्यवसाय बंद करावा, अन्यथा पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
