बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर व प्रकाशव्यवस्थेअभावी वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न
धरणगाव, प्रतिनिधी – प्रशांत शिंदे : रोटवद ते साळवा फाटा मार्गावरील जिनिंगजवळ रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही संबंधित ठिकाणी पुरेसे बॅरिकेडिंग, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाशव्यवस्था नसल्याने हा भाग अपघातप्रवण ठरत असल्याची भीती वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, वाहनांच्या वाहतुकीसाठी अरुंद मार्ग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खोदकामाचा अंदाज न आल्यास वाहन थेट खड्ड्यात जाण्याची अथवा दुसऱ्या वाहनाला धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या मार्गावर यापूर्वीच ट्रकचा अपघात झाल्याचे छायाचित्रांमधून दिसून येत असून, त्यामुळे रस्त्याच्या सद्यस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काम आवश्यक; मात्र सुरक्षेला प्राधान्य द्या
रस्त्याच्या विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही. मात्र, काम सुरू असताना वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खोदकामाच्या ठिकाणी तातडीने मजबूत बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक तसेच रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेले खोदकाम तातडीने सुरक्षित करावे, ठिकठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग व रिफ्लेक्टर बसवावेत.
रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी.
वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे स्पष्ट दिशादर्शक व चेतावणी फलक लावावेत.
संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
“रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे; मात्र कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीविताची आणि वाहतुकीची सुरक्षितता प्रथम सुनिश्चित केली पाहिजे. प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
