दहिवेलमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान
‘आंगण का उत्सव’ उपक्रमातून २१ अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांचा गौरव; चिमुकल्यांना बिस्किटांचे वाटप
दहिवेल, ता. साक्री, जि. धुळे, दि. ७ : सेवा सप्ताहानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत ‘आंगण का उत्सव’ हा विशेष उपक्रम दहिवेल परिसरात उत्साहात राबविण्यात आला. दहिवेल, डाबरी, सडकपाडा, मैंदाणे, ओझरपाडा, किरवाडे, भोनगाव आणि सातरपाडा या गावांमधील एकूण २१ अंगणवाड्यांतील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
बालकांचे संगोपन, पोषण, आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्या बालकांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या कार्यक्रमाला धुळे जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. धरती निखिल देवरे यांच्यासह किरवाडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मालचे, उपसरपंच सुनील मराठे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. सुवर्णा अजगे, सौ. सुवर्णा काकुस्ते, महिला मोर्चाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा सप्ताहाचे उपक्रम
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या उपक्रमांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीश भाई पटेल यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे आयोजकांनी सांगितले. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे तसेच भाजपा पदाधिकारी यांच्या संयोजनातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा सप्ताहानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत.
धुळे जिल्हा महिला मोर्चाच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि संघटन कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
‘अंगणवाडी सेविकांचे योगदान अमूल्य’
यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. धरती निखिल देवरे म्हणाल्या, “बालकांचे संगोपन, पोषण, आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यासाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अमूल्य योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाल व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सेवा सप्ताहानिमित्त धुळे जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले असून, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.”
