बोरगावात दोन गावांचे एकच दुर्गा देवी मंडळ; २६ वर्षांची एकोप्याची परंपरा!
कीर्तन, दांडिया, लोकनाट्य आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; बोरगाव बुद्रुक व खुर्द गावांतील ग्रामस्थांचा उत्सवासाठी एकत्रित पुढाकार
बोरगाव, ता. धरणगाव : बोरगाव बुद्रुक आणि बोरगाव खुर्द या दोन गावांमध्ये धार्मिक एकोपा आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे उदाहरण पाहायला मिळते. दोन्ही गावांसाठी एकाच दुर्गा देवी मंडळाची स्थापना करून गेल्या २६ वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा जपली जात आहे. दिवंगत सजन आनंदा सोनवणे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा आजही उत्साहाने पुढे नेली जात आहे. यंदाही जय दुर्गा माता उत्सव समितीच्या वतीने कीर्तन, दांडिया, लोकनाट्य आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ११ तारखेला ह.भ.प. शुभम महाराज मंदाणेकर, १२ तारखेला ह.भ.प. दीपिकाताई देवीळीकर, १३ तारखेला ह.भ.प. योगी दत्तानाथ महाराज नरडाणा आणि १४ तारखेला ह.भ.प. स्वप्निल महाराज गिरड यांचे कीर्तन होणार आहे.
१५ तारखेला देवीची यात्रा असून रात्री रतन भाऊ व सोमनाथ भाऊ नगरदेवळेकर यांच्या तमाशा मंडळाचा लोकनाट्य कार्यक्रम होईल. १६ तारखेला ह.भ.प. स्नेहलताई सामनेर यांचे कीर्तन, तर १७ तारखेला दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ तारखेला पुणे येथील इंजि. ह.भ.प. तेजश्रीताई शिंपी, १९ तारखेला ह.भ.प. मनोज महाराज ऐनगावकर आणि २० तारखेला ह.भ.प. महंत अशोक महाराज शिरपूर यांचे कीर्तन होणार आहे. २१ तारखेला ह.भ.प. गोविंद महाराज पाचोरा यांच्या काल्याच्या कीर्तनाने धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल. हे कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे.
२३ तारखेला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देवीच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दोन गावे, एक उत्सव; ऐक्याची अनोखी परंपरा
बोरगाव बुद्रुक येथे सुमारे ३६ वर्षांपूर्वी दुर्गा देवीचे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात गेल्या २६ वर्षांपासून नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. बोरगाव बुद्रुक आणि बोरगाव खुर्द या दोन्ही गावांच्या ग्रामपंचायती स्वतंत्र आहेत. गावांदरम्यान नदी असून, नदीवरील पुलामुळे दोन्ही गावांतील नागरिकांचा नियमित संपर्क असतो. स्वतंत्र ग्रामपंचायती असूनही एकाच दुर्गा देवी मंडळाच्या माध्यमातून दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी जपलेला एकोपा परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामस्थांचा उत्सवासाठी पुढाकार
उत्सवाच्या यशस्वितेसाठी आयोजक पिंटू पाटील, जय दुर्गा माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. महाप्रसादासाठी योगदान देणाऱ्या मानकऱ्यांमध्ये किशोर पाटील (विकी), दीपक पाटील (RG), निंबा कंखरे, सुनील पाटील (छत्रपती संभाजीनगर), धनंजय पाटील, योगेश पाटील, मयूर मराठे आणि बोरगाव आश्रमशाळेतील महेंद्र पाटील यांचा समावेश आहे.
दोन गावांनी मिळून जपलेली २६ वर्षांची ही धार्मिक आणि सामाजिक ऐक्याची परंपरा यंदाच्या नवरात्रोत्सवातूनही अधोरेखित होत आहे.
