मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांना सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करा!
जागतिक मानसिक आरोग्य दिन व पॅलिएटिव्ह केअर दिनानिमित्त धुळ्यात जनजागृती रॅली; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांचे आवाहन
धुळे, प्रतिनिधी | १० ऑक्टोबर २०२६ : मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त व्यक्तींचे अनुभव संवेदनशीलतेने ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या आणि सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले. जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि पॅलिएटिव्ह केअर दिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्या वतीने शनिवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला डॉ. सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमात डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले. मानसिक आरोग्याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणे, मानसिक आजारांची लक्षणे ओळखणे आणि गरजेनुसार वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश होता.
मानसिक आरोग्याबाबत संकोच नको
‘अनुभवांना मिळू द्या आवाज, त्यातून घडू द्या सकारात्मक बदल’ हा जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२६ चा संदेश अधोरेखित करताना डॉ. सोनवणे यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव ऐकून घेणे आणि त्यांच्या भावनांना महत्त्व देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांना समजून घेऊन समुपदेशन आणि योग्य उपचारांची संधी उपलब्ध करून द्यावी. मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत संकोच किंवा भीती न बाळगता नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पॅलिएटिव्ह केअरमुळे रुग्णांना दिलासा
गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या शारीरिक वेदना कमी करणे, त्यांना मानसिक व भावनिक आधार देणे आणि रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे, ही पॅलिएटिव्ह केअरची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत, असे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.
अशा रुग्णांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच कुटुंबीय आणि समाजानेही संवेदनशीलतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या वेदना आणि अडचणी समजून घेत त्यांना आवश्यक आधार देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय रॅली
जनजागृती रॅलीला जिल्हा रुग्णालयातून सुरुवात झाली. जिल्हा परिषद मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आदित्य बिर्ला संवेदना प्रकल्प, शासकीय नर्सिंग कॉलेज, सेवा नर्सिंग कॉलेज, सरस्वती नर्सिंग कॉलेज आणि राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) यांचे प्रतिनिधी व विद्यार्थी सहभागी झाले.
मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे, गरजू रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे आणि मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. समीर शेख, डॉ. विवेक जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक डी. एस. महाजन, सहायक लोक अभिरक्षक मुकेश पाचपुते, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे डॉ. हरीश मेहरा आणि मनोविकृतीतज्ज्ञ डॉ. विक्रम वैद्य उपस्थित होते. रॅलीच्या आयोजनासाठी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नर्सिंग महाविद्यालयांचे सहकार्य लाभले.
