कामगार पाल्यांनो, आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करा!
दीपनगर केंद्र संचालक किशोर पाटील यांचे आवाहन; शिष्यवृत्तीपासून परदेशी शिक्षणापर्यंत विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी
भुसावळ | संघरत्न सपकाळे
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी त्वरित ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण केंद्र, दीपनगरचे केंद्र संचालक किशोर पाटील यांनी केले आहे. अर्ज करण्यास विलंब झाल्यास किंवा अर्ज न केल्यास पात्र लाभार्थी आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शिक्षण, आरोग्य आणि करिअरसाठी आर्थिक मदत
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांमधून कामगार पाल्यांना शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, क्रीडा, साहित्य लेखन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आणि कामगार पाल्यांनी मंडळाच्या public.mlwb.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित योजनेनुसार ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे किशोर पाटील यांनी सांगितले.
या योजनांसाठी करता येणार अर्ज
कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश आहे.
-
शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना
-
एमएससीआयटी अर्थसहाय्य योजना
-
टंकलेखन अर्थसहाय्य योजना
-
चारचाकी वाहन प्रशिक्षण अर्थसहाय्य योजना
-
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य योजना
-
परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना
-
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना
-
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
-
साहित्य लेखन अर्थसहाय्य अनुदान योजना
-
एमपीएससी, यूपीएससी व पीएचडीपूर्व परीक्षेसाठी उत्तीर्ण सहाय्य योजना
अर्ज करताना कागदपत्रांची अचूकता महत्त्वाची
पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि जोडलेली कागदपत्रे अचूक असल्याची खात्री करावी, जेणेकरून अर्ज प्रक्रियेत त्रुटी निर्माण होणार नाहीत.
अर्जात कोणतीही त्रुटी नसल्यास ४५ दिवसांच्या आत आर्थिक लाभ मिळतो, अशी माहिती केंद्र संचालकांनी दिली. मंजूर सहाय्याची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होत असल्याने संबंधित बँक खाते कार्यरत असणे आवश्यक आहे. बँक खाते चालू ठेवण्याची जबाबदारी अर्जदाराची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीसाठी दीपनगर केंद्राशी संपर्क साधा
योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर शंकांबाबत मार्गदर्शन हवे असल्यास कामगार पाल्यांनी कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच public.mlwb.in या अधिकृत संकेतस्थळावर योजनांची सविस्तर माहिती तपासून अर्ज सादर करावेत.
“कामगार पाल्यांनी उपलब्ध संधी गमावू नये. मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले शिक्षण, आरोग्य आणि करिअर अधिक सक्षम करावे,” असे आवाहन केंद्र संचालक किशोर पाटील यांनी केले आहे.
