राजस्थानच्या मिणा समाजाचे विजयसिंग पागडी यांची भडगावला सदिच्छा भेट!
अशोकबापू परदेशी यांच्या निवासस्थानी उत्साहात स्वागत; समाज संघटन, एकजूट आणि जावळे येथील मंगल कार्यालयाच्या उभारणीबाबत चर्चा
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील सिकराय तालुक्यातील मोरेड येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत असलेले मिणा समाजाचे विजयसिंग पागडी (घुणावत) यांनी भडगाव येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी परदेशी, राजपूत, मिणा समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अशोकबापू परदेशी यांच्या निवासस्थानी त्यांचे कुटुंबीय आणि समाजबांधवांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान समाज संघटनेची बांधणी, समाजाच्या प्रगतीसाठी सुरू असलेले उपक्रम आणि सामाजिक एकजूट अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
महाराष्ट्रातील मिणा समाजाच्या कार्याचे राजस्थानकडून कौतुक
विजयसिंग पागडी यांनी महाराष्ट्रातील मिणा, परदेशी आणि राजपूत समाजबांधवांच्या कार्याचे कौतुक केले. समाज संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्रातील समाजबांधवांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजातील विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य, समाजबांधवांचे योगदान आणि संघटन विस्तारासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. समाजाच्या प्रगतीसाठी परस्पर सहकार्य आणि संघटनात्मक एकता महत्त्वाची असल्याचे मतही चर्चेत व्यक्त करण्यात आले.
जावळे येथील मंगल कार्यालयाच्या कामाचे अभिनंदन
चाळीसगाव येथील परदेशी, राजपूत समाज उन्नती मंडळाच्या पुढाकारातून जावळे येथे सुरू असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामाबाबत विजयसिंग पागडी यांनी समाधान व्यक्त केले. समाजासाठी मंगल कार्यालय उभारण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, यामुळे समाजबांधवांना विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या मंगल कार्यालयासाठी जावळे येथील भूमिपुत्र आणि समाजसेवक भगवानबापू लोदवाळ व गोरखदादा लोदवाळ यांच्या कुटुंबाने विनामोबदला दीड एकर जमीन दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजहितासाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी लोदवाळ कुटुंबाचे आभार मानले.
चाळीसगाव येथील परदेशी, राजपूत समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल, कार्याध्यक्ष डॉ. कर्तारसिंग बापू परदेशी, सचिव निलेशभाऊ राजपूत तसेच सर्व संचालक मंडळाचेही त्यांनी अभिनंदन केले. समाजाच्या विकासासाठी मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विजयसिंग पागडी आणि पत्नीचा सन्मान
भडगाव येथे झालेल्या स्वागत समारंभात अशोकबापू परदेशी यांनी विजयसिंग पागडी यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या पत्नी सौ. रेश्मा मिणा यांचा वाडे ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला उपसरपंच सौ. ऊषाबाई अशोक परदेशी आणि जंगीपुरा येथील अल्काबाई परदेशी यांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थित समाजबांधवांनी विजयसिंग पागडी आणि सौ. रेश्मा मिणा यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील परस्पर स्नेह, एकोपा आणि आपुलकीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले.
जंगीपुरा आणि चाळीसगाव येथेही भेटी
भडगाव येथे येण्यापूर्वी विजयसिंग पागडी आणि त्यांच्या पत्नी सौ. रेश्मा मिणा यांनी जंगीपुरा येथे युवराजभाऊ परदेशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. या प्रसंगी समाजबांधव, महिला आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी भडगाव येथे अशोकबापू परदेशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पुढे चाळीसगाव येथील परदेशी, राजपूत, मिणा समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ परदेशी यांच्या निवासस्थानीही त्यांनी सदिच्छा भेट दिली. तेथे चहापानादरम्यान समाजाच्या सुरू असलेल्या कार्याबाबत, समाजबांधवांच्या योगदानाबाबत आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
या भेटीप्रसंगी जंगीपुरा येथील युवराजभाऊ परदेशी, शेंदुर्णी येथील मुन्नाभाऊ परदेशी, अनिताबाई परदेशी, मिनाबाई परदेशी, सिमाताई परदेशी यांच्यासह विविध ठिकाणचे समाजबांधव उपस्थित होते.
राजस्थान आणि महाराष्ट्रातील समाजबांधवांमध्ये परस्पर संवाद, सामाजिक एकजूट आणि संघटनात्मक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
