वाढदिवसाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्याचा स्तुत्य उपक्रम; शासकीय विद्यानिकेतनमध्ये भव्य आरोग्य शिबिर!
माजी विद्यार्थी राजेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; ‘गिव्ह बॅक फाउंडेशन’तर्फे स्वच्छ व सुंदर खोली पुरस्काराचे वितरण
धुळे | प्रतिनिधी
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता केवळ शब्दांत नव्हे, तर सामाजिक उपक्रमांतून व्यक्त करावी, याचा आदर्श शासकीय विद्यानिकेतन, धुळे येथील माजी विद्यार्थी राजेंद्र पाटील यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. आरोग्य तपासणीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमालाही यावेळी प्रोत्साहन देण्यात आले.
महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये आयोजित या शिबिरासाठी धुळे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. विशेष म्हणजे, डॉ. सोनवणे हे माजी विद्यार्थी राजेंद्र पाटील यांचे जावई आहेत. कौटुंबिक जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
माजी विद्यार्थ्यांचा सन्मान; डॉ. सोनवणे यांचेही कौतुक
शाळेच्या पहिल्या, १९७१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी राजेंद्र पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी कनकसिंग पवार आणि गुलाबराव वाघ सर यांचाही सत्कार करण्यात आला.
शासकीय सेवेतील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांचाही शाळेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
‘गिव्ह बॅक फाउंडेशन’तर्फे स्वच्छ व सुंदर खोली पुरस्कार
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी आणि वसतिगृहातील परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लागावी, या उद्देशाने शाळेत ‘स्वच्छ व सुंदर खोली’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘गिव्ह बॅक फाउंडेशन’च्या माध्यमातून आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. टी. चंद्रकांत दादा यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
वसतिगृहातील सर्वांत स्वच्छ व सुंदर खोली म्हणून निवड झालेल्या खोलीतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुचित्रा पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले नाते जपत आरोग्यसेवा आणि स्वच्छतेसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य दिल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
वाढदिवस साजरा करण्याची परंपरागत पद्धत बाजूला ठेवून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
