धरणगावात राष्ट्रसंत मीरा माता जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दहावी, बारावी, पदविका, पदवी आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सन्मान; विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांचेही वितरण
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव येथे राष्ट्रसंत मीरा माता यांच्या जयंतीनिमित्त राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. इयत्ता दहावी, बारावी, पदविका, पदवी तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजपूत समाजाचे अध्यक्ष जीवनसिंह बायस होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सतीशसिंह जनकवार, सचिव गणेशसिंह सूर्यवंशी, सदस्य गोपालसिंह बायस, नवनियुक्त नगरसेवक नितीनसिंह बायस, गोपालसिंह जनकवार, प्रल्हादसिंह चव्हाण, विजयसिंह जनकवार आणि श्यामसिंह चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत मीरा माता आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध शैक्षणिक स्तरांवर तसेच क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके
प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनसिंह बायस यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच डॉ. कमलेशसिंह बायस यांच्या वतीने त्यांचे मित्र स्व. लक्ष्मीकांतसिंह सरदारसिंह तोमर परदेशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत
सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांमधून युवराज कमलेशसिंह बायस आणि विजयसिंह जनकवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केले, तर निलेशसिंह जनकवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजपुताना फाउंडेशन तसेच महाराणा प्रतापसिंह चौफुलीचे अध्यक्ष प्रथमसिंह सूर्यवंशी यांच्यासह निशांतसिंह बायस, स्वप्नीलसिंह जनकवार, महेशसिंह सूर्यवंशी, निलेशसिंह जनकवार, ज्ञानेश्वरसिंह जनकवार, गोविंदसिंह जनकवार, महेंद्रसिंह चव्हाण, सुरेशसिंह चव्हाण आणि नरेंद्रसिंह जनकवार यांनी सहकार्य केले.
