अंबड तालुक्यात अवैध रेती उपशाचा धुमाकूळ; पाणीपातळी खालावल्याचा आरोप
दररोज ४०० ते ५०० हायवा आणि ३०० ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी होत असल्याचा आंबेडकर जन मंचाचा दावा; कारवाई न झाल्यास २८ ऑक्टोबरपासून गोरी गांधारी फाट्यावर आमरण उपोषणाचा इशारा
जालना प्रतिनिधी | विलास म्हस्के
अंबड : अंबड तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप आंबेडकर जन मंचाने केला आहे. नदीपात्रातील बेसुमार उत्खननामुळे पाणीपातळी खालावत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास २८ ऑक्टोबरपासून गोरी गांधारी फाट्यावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
या संदर्भात आंबेडकर जन मंचाचे मुख्य संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष विलास मस्के, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनीषा घोष आणि मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्षा शितल बाळू जमदाडे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
दररोज शेकडो वाहनांतून रेतीची वाहतूक होत असल्याचा दावा
निवेदनानुसार, गोंदी, पाथरवाला, कुरण, हसनापूर, बळेगाव, लक्ष्मीआई मंदिर परिसर, बाबाची थडी पाथरवाला, शहागड, गौरी गांधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव आणि आपेगाव या भागांत गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या परिसरातून दररोज ४०० ते ५०० हायवा आणि सुमारे ३०० ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी होत असल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असताना संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई का होत नाही, तसेच या प्रकाराला कोणाचे अभय आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
उत्खनन झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्याची मागणी
अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रेती उपसा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशी मागणी आंबेडकर जन मंचाने केली आहे.
अवैध उत्खननामुळे जलस्रोतांवर परिणाम होत असल्याचा संघटनेचा आरोप असून, या प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
अवैध रेती उपशाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासह निवेदनातील मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ पासून गोरी गांधारी फाटा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब मगर, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्षा शितल जमदाडे यांच्यासह आंबेडकर जन मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड; तहसीलदार, अंबड आणि पोलीस निरीक्षक, गोंदी पोलीस ठाणे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
