जळगावमध्ये SEA चा ऐतिहासिक संघर्ष! अन्यायकारक निलंबनाविरोधात अभियंत्यांचा ठिय्या; प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध
दोन सहाय्यक अभियंत्यांच्या निलंबनावरून वातावरण तापले; २०० हून अधिक महिला-पुरुष अभियंत्यांची एकजूट, पोलीस बंदोबस्तात दालन रिकामे करण्याचा प्रयत्न झाल्याचा संघटनेचा आरोप
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव मंडळातील दोन सहाय्यक अभियंत्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून स्टेट इंजिनिअर्स असोसिएशन (SEA) आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी JMD कोकण प्रादेशिक विभागाच्या भेटीदरम्यान अधीक्षक अभियंता, जळगाव यांनी दोन सहाय्यक अभियंत्यांचे एकतर्फी आणि अन्यायकारक निलंबन केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या निलंबनाच्या निषेधार्थ २७ ऑक्टोबर रोजी SEA जळगाव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात शांततापूर्ण ठिय्या आंदोलन केले.
चर्चेतून तोडगा निघाला नाही; अभियंत्यांचा ठिय्या कायम
संबंधित दोन्ही सहाय्यक अभियंत्यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी SEA जळगाव मंडळाचे जॉइंट सेक्रेटरी, सर्कल सचिव, सर्कल अध्यक्ष आणि अन्य सभासद अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात चर्चेसाठी उपस्थित झाले होते. अन्यायकारक निलंबन मागे घेऊन प्रश्नावर तोडगा काढावा, अशी संघटनेची मागणी होती.
मात्र, अधीक्षक अभियंत्यांकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत सभासदांनी दालनात शांततापूर्ण ठिय्या मांडला. निलंबनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत अभियंत्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
५० पोलिसांचा फौजफाटा आणि CRPF वाहन बोलावल्याचा आरोप
संघटनेच्या म्हणण्यानुसार, चर्चेतून तोडगा निघत नसताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने पोलीस निरीक्षकांसह सुमारे ५० पोलिसांचा बंदोबस्त आणि CRPF चे वाहन बोलावले. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील २०० हून अधिक महिला व पुरुष अभियंते उपस्थित होते.
आंदोलन करणाऱ्या अभियंत्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत त्यांची धरपकड करण्याच्या उद्देशाने दालन रिकामे करण्याचा जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याचा आरोप SEA ने केला आहे. मात्र, संघटनेचे सर्व सभासद एकजुटीने ठाम उभे राहिल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागल्याचेही संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अभियंत्यांच्या एकजुटीचे प्रदर्शन; प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध
शांततापूर्ण चर्चेसाठी आलेल्या अभियंत्यांच्या भूमिकेचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत SEA जळगाव मंडळाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
या आंदोलनातून SEA जळगाव मंडळातील अभियंत्यांची एकजूट अधोरेखित झाली. दोन सहाय्यक अभियंत्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधातील नाराजी यामुळे जळगाव मंडळातील वातावरण तापले आहे.
“जोर-जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है!” या घोषणेसह SEA च्या सभासदांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. निलंबनाचा प्रश्न मार्गी लागणार का आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार, याकडे आता अभियंता वर्गाचे लक्ष लागले आहे.
