तारापारमधील वीज समस्येवर लोकप्रतिनिधी आक्रमक; महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर!
शेतकऱ्यांच्या अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर; अर्ध्या तासात समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा
नशिराबाद, जळगाव | शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण प्रतिनिधी
नशिराबादसह भादली, कडगाव आणि जळगाव खुर्द हद्दीतील तारापार परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नावर लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील आणि भाजपचे गटनेते तथा नगरसेवक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांसह महावितरणच्या नशिराबाद उपविभागीय कार्यालयात धडक देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.
आधीच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीसमोर संकट उभे असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
निवेदनानंतर दोन दिवसच वीजपुरवठा सुरळीत!
तारापार परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यापूर्वीही संबंधित यंत्रणेकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांसाठी वीजपुरवठा सुरळीत झाला; मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे शेतीच्या कामांचे नियोजन कोलमडत असून, पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब; पालकमंत्र्यांकडेही प्रश्न मांडला
या वेळी नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील आणि लालचंद भाऊ पाटील यांनी महावितरणचे संबंधित अधिकारी सोनवणे आणि जोशी यांच्याकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विषय पालकमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढील अर्ध्या तासात वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मात्र, दिलेल्या वेळेत समस्या सुटली नाही, तर पुढील भूमिका ठरवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा लोकप्रतिनिधींनी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही!
“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळेपर्यंत त्यांचा आवाज ठामपणे मांडत राहू,” अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट केली.
या प्रसंगी भादली, कडगाव, जळगाव खुर्द आणि नशिराबाद हद्दीतील तारापार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने महावितरणच्या नशिराबाद उपविभागीय कार्यालयात उपस्थित होते.
आता महावितरणने दिलेल्या आश्वासनानुसार वीजपुरवठा सुरळीत होतो का आणि शेतकऱ्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघतो का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
