शिक्षणमंत्री ॲक्शन मोडमध्ये! अजनाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलंबित करण्याचे आदेश
शाळेची पटसंख्या ४०, प्रत्यक्ष उपस्थिती केवळ ७ विद्यार्थी; अस्वच्छ परिसर आणि शैक्षणिक गुणवत्तेतील त्रुटींवर दादा भुसे संतप्त, अधिकाऱ्यांसह शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
धुळे | प्रतिनिधी
शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत हलगर्जीपणा आढळल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धुळे तालुक्यातील अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेची अचानक पाहणी करत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. शाळेची पटसंख्या ४० असताना प्रत्यक्षात केवळ सात विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले. तसेच शालेय परिसरातील अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या गणवेशाची स्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबतही त्रुटी निदर्शनास आल्याने मुख्याध्यापक किशोर परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी आणि शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.
अचानक पाहणीत शाळेतील त्रुटी उघड
मालेगावहून धुळ्याच्या दिशेने येत असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धुळे तालुक्यातील अजनाळे गावातील पारधी वस्तीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. या पाहणीदरम्यान शाळेचा परिसर अस्वच्छ असल्याचे, पटसंख्या ४० असतानाही प्रत्यक्ष उपस्थिती केवळ सात विद्यार्थ्यांची असल्याचे आढळले. विद्यार्थ्यांच्या गणवेशाची स्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शाळेच्या कामकाजात आढळलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत भुसे यांनी मुख्याध्यापक किशोर परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील सर्व शाळांच्या स्वच्छतेचे आदेश
अजनाळे येथील शाळेच्या पाहणीनंतर शिक्षणमंत्र्यांनी जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेचा मुद्दाही उपस्थित केला. पुढील १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्याचे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.
शिक्षण विभागात खळबळ
शिक्षणमंत्र्यांनी अचानक भेट देऊन त्रुटींची पाहणी केल्याने जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेचा नियमित आढावा घेण्याची आवश्यकता या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आता संबंधित अधिकारी आणि शिक्षकांच्या स्पष्टीकरणानंतर पुढील प्रशासकीय कारवाईकडे लक्ष लागले आहे.
