सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती शेतकऱ्यांच्या बांधावर साजरी!
लेवा हितवादी चळवळीचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे दानशूर व्यक्तींना आवाहन
भुसावळ | प्रमोद पाटील – प्रतिनिधी
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘लेवा हितवादी चळवळी’च्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. राज्यावर दुष्काळाचे सावट असताना जयंती केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरती मर्यादित न ठेवता, चळवळीच्या कार्यकर्त्यांनी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत हा दिवस साजरा केला. संकटकाळात बळीराजाला मानसिक आधार देणे आणि प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
बळीराजाला मदत करणे हीच सरदार पटेलांना खरी आदरांजली!
यावेळी बोलताना लेवा हितवादी चळवळीचे मुख्य प्रवर्तक शिशिर जावळे यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती आणि सामाजिक संस्थांना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
“बळीराजा हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टांवर संपूर्ण अर्थव्यवस्था आधारित आहे. त्यामुळे केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच सरदार पटेलांना खरी आदरांजली ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे, खते, पाण्याचे टँकर आणि किराणा साहित्य पुरविण्याबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची गरजही जावळे यांनी अधोरेखित केली.
पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन
या उपक्रमादरम्यान संत सेवा मंडळाचे प्रकाश जैस्वाल आणि पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यावरण संवर्धन, निसर्गाचा समतोल राखणे आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांसह मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख देवेंद्र वराडे, मुरलीधर लोखंडे, यशवंतदादा पाटील, मिलिंद धांडे, वासुदेव कोळी, बापूदादा महाजन, शंकर भुसे, तुकाराम खाचणे, भागवत पाटील, प्रांजल पाटील, ॲड. सागर सरोदे आणि आर. के. कोळी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी झालेली सरदार पटेल यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपणारी ठरली. केवळ अभिवादन न करता शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये सहभागी होऊन मदतीचा संकल्प करणे, हा सरदार पटेल यांच्या विचारांचा वारसा कृतीत उतरविणारा उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
