राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘आई’ विषयावरील काव्यस्पर्धेला सुरुवात!
रुद्राणी राऊत प्रथम, शुभम कवाडे द्वितीय तर विनया तुरबे तृतीय; १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन कविता पाठविण्याचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी :
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुस्तकाधारित निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत रुद्राणी विनोदराव राऊत यांनी प्रथम, शुभम संजय कवाडे यांनी द्वितीय, तर विनया सुधाकर तुरबे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासोबतच चार स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर
या स्पर्धेत तेजस प्रदीप कासार, चेतन कृष्णा जाधव, भूषण ज्ञानेश्वर सोळुंके आणि वैशाली जयवंत कांबळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांपासून शिक्षक, गृहिणी आणि विविध क्षेत्रांतील वाचकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पुस्तकाधारित लेखनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासण्याचा आणि वैचारिक अभिव्यक्तीला चालना देण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला.
‘आई’ विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा
निबंध स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर चळवळीच्या वतीने आता ‘आई’ या वैचारिक विषयावर भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून कविता पाठविण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
या स्पर्धेसाठी ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगरचे माजी प्राचार्य तथा हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. रामकृष्ण बदने हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कवींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विजेत्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन
वाचनसंस्कृती वाढीस लावणे, नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रबोधनात्मक विचार समाजात रुजवणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक, राज्य नियोजन समितीचे सदस्य आयु. सुकलाल पाटील, लेखिका स्वाती चव्हाण, कवी अंकुश सोनवणे, रिता रामटेके, शुभांगी गुरचळ, प्राचार्य संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर, राज्य सांस्कृतिक विभागाचे डॉ. अविनाश मनवर, कवयित्री सुनंदा साबळे आणि वैशाली देठे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
