पी.आर. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दंत व मुखआरोग्याचे धडे!
दंतचिकित्सक डॉ. मयूर जैन यांचे मार्गदर्शन; दातांची निगा राखण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक
धरणगाव | प्रतिनिधी
“प्रथमं सुखं आरोग्यम्” या उक्तीला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पी.आर. हायस्कूलमध्ये दंत व मुखआरोग्य विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ दंतचिकित्सक डॉ. मयूर जैन यांनी विद्यार्थ्यांना दातांची आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते. शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील आणि पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
दातांच्या आरोग्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्रास्ताविकात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी शाळेत दरवर्षी अशा आरोग्यविषयक व्याख्यानांचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत शाळा नेहमीच दक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या व्याख्यानात डॉ. मयूर जैन यांनी दात किडणे, हिरड्यांतून रक्त येणे, तोंडाची दुर्गंधी आणि दातांची अनियमित वाढ यांसारख्या समस्यांची कारणे व त्यावरील योग्य उपचारांची माहिती दिली.
“दात हे आपल्या सौंदर्याचे आणि आरोग्याचे प्रवेशद्वार आहेत,” असे सांगत त्यांनी दिवसातून दोन वेळा योग्य पद्धतीने दात घासणे, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरणे, चॉकलेट, गुटखा व तंबाखूपासून दूर राहणे आणि दर सहा महिन्यांनी दंततपासणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दात घासण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
आरोग्यदायी सवयींचे संस्कार आवश्यक
अध्यक्षीय मनोगतात डॉ. मिलिंद डहाळे म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे आरोग्य चांगले असेल, तरच ते अभ्यासात एकाग्र होऊ शकतील. शाळेने केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक चांगल्या सवयी आणि संस्कार रुजविणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गोपाल चौधरी यांनी केले, तर डॉ. बापू शिरसाठ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
