वर्गमित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांची दिवाळी झाली गोड!
महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम; दिवाळी फराळ व भेटवस्तू देत विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आनंद
भुसावळ | प्रतिनिधी : प्रमोद पाटील
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांना हा सण मनमुराद साजरा करता येत नाही. अशा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय आणि अहिल्यादेवी कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्गमित्र-मैत्रिणींची दिवाळी’ हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आपल्या वर्गातील गरजू मित्र-मैत्रिणींची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या भावनेतून विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत दिवाळी साहित्य आणि भेटवस्तू गोळा केल्या. अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही दिवाळी फराळासाठी आर्थिक योगदान देत उपक्रमाला सहकार्य केले.
गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फराळाचे वाटप
या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना दिवाळी फराळ, शेव, चिवडा, लाडू, मिठाई आणि इतर साहित्य भेट म्हणून देण्यात आले. केवळ साहित्याचे वाटप न करता विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
वर्गातील मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा प्रयत्न मैत्री, सहकार्य, सामाजिक एकता आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणारा ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या आनंदात सहभागी होत दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून अधोरेखित केला.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, पर्यवेक्षक विनोद उबाळे, प्रकल्पप्रमुख शरद तायडे तसेच सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.
अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक नारायण घोडके, प्रकल्पप्रमुख कोमल जोशी आणि सर्व शिक्षकांनीही उपक्रमासाठी परिश्रम घेतले. दोन्ही विद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला.
शिक्षणासोबत माणुसकीचे संस्कार
‘आपला आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर फुलविणे, हीच खरी दिवाळी!’ या भावनेला प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, दातृत्व, बंधुभाव आणि संवेदनशीलता रुजविणारा ठरला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये माणुसकीची मूल्ये विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून माणुसकी जपण्याचा आदर्श प्रयत्न म्हणून ‘वर्गमित्र-मैत्रिणींची दिवाळी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
